10 खाद्यपदार्थांनी वाढवा मकर संक्रांतीचा गोडवा

11 minute
Read

Highlights तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजे 'मकर संक्रांत'. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच येणारा हा सण. आरोग्याच्या दृष्टीने संक्रांतीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेतील स्निग्धता कमी होऊन ती कोरडी होते. तसेच शरीरातील उष्णताही कमी होते. तीळ स्निग्धता कायम ठेवण्याचे तर गूळ शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करतो. यात तीळगुळापासून छान छान खाद्यपदार्थ तयार केले जातात. हे खाद्यपदार्थ कोणते? त्यासाठी कोणते साहित्य लागते? या सगळ्याची माहिती हवी असेल तर चला वाचूया....संक्रांतीचा गोडवा वाढविणारे 10 पदार्थ

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

आपल्याकडे सण म्हटलं की मिठाई आलीच. 'मकर संक्राती'मध्ये तीळगुळाचा मान मोठा आहे. मकर संक्रांत आणि तीळगूळ हे समीकरण  आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. तसंच गुळातही उष्णता असते. थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे तीळगूळ बनतात. म्हणून तर तीळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हटले जाते. तीळापासून विविध खाद्यपदार्थ केले जातात आणि आपली मकर संक्रांत अधिक गोड होते.

1. तीळाचे लाडू

साहित्य - पाव किलो पॉलिश तीळ, एक मोठा  किसलेले सुके खोबरे, एक वाटी शेंगदाणे, पाव किलो चिक्कीचा गूळ, वेलची पूड, एक छोटा चमचा तूप

कृती - तीळ मंद गॅसवर भाजून घ्यावे.तडतडू लागले की उतरावे.त्यानंतर सुके खोबरे थोडेसे भाजून घ्यावे.शेंगदाणे भाजून सोलुन घ्यावे आणि जाडसर कुटुन घ्यावे.तीळ, खोबरे, शेंगदाणे एकत्र करून बाजूला करून ठेवावे.एका पातेल्यात थोडेसे तूप घालून त्यावर गूळ घालावा पाणी घालू नये.मंद गॅसवर पातळ होवू द्यावा.एका वाटीत पाणी घेऊन २-३ थेंब पाकाचे घालावे.गोळी झाली की पाक झाला असे समजून त्यातएकत्र केलेले सर्व सामान घालून घ्यावे.वेलची पूड घालून एकत्र करून घ्यावे.तळ हाताला थोडेसे तूप लावून मिश्रण गरमअसतानाच लाडू वळून घ्यावे.थंड झाले की तयार लाडू हवाबंद डब्ब्यात भरून ठेवावे.

2. पाक विरहीत तीळाचे लाडू

साधारण 1 किलो तीळ स्वच्छ निवडून मंद  आचेवर लालसर भाजून घ्यावा.तीळ फार लवकर जळतात, त्यामुळे मंद आचेवर मोठ्या चमच्याने सारखे हलवावे. तीळ छान खरपूर आणि थोडेसे लालसर झाले फुगल्यासारखे वाटले की ताटात काढून घ्यावे. मग यातील निम्मे तीळ मिक्सरला बारीक करून घ्यावेत. साधारण अर्धा किलो गूळ चिरून घेतला (आवडीप्रमाणे गुळ घालावे) आणि तिळाची भरड काढली आहे त्यासोबत मिक्सरमध्ये फिरवला. आता ती गुळमिश्रीत भरड आणि उरलेला तीळ एकत्र केला आणि तुपाचा हात लावून लाडू वळून घेतले. पाकाची कटकट नाही आणि झटपट लाडू तयार होतात.

3.तीळाचे कंदि लाडू

खमंग नरम तीळाचे हे लाडू कंदी पेढ्यासारखे दिसतात म्हणून कंदी लाडू म्हणतात.

साहित्य - 2 कप साधे पांढरे तीळ (पॉलिश न केलेले), पाव कप भाजलेले शेंगदाणे, पाव कप किसलेले सुकं खोबरं, साधा गूळ (चिक्कीचा नाही) बारीक चिरून अंदाजे पावणेदोन - दोन कप, पाव  चमचा वेलची पूड, तूप १ चमचा

कृती - तीळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या. रंग जरा बदलला पाहिजे. ताटलीत काढून गार करा.खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. ताटलीत काढून गार करा.भाजलेले शेंगदाणे सोलून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या. आता मिक्सरमध्ये शेंगदाण्याबरोबर तीळ, खोबरं आणि गूळ घाला आणि बारीक वाटून घ्या. मिश्रण जरा ओलसर होईल.मिश्रण ताटलीत काढून लहान लहान लाडू वळा. जर मिश्रण सुकं झालं असेल तर त्यात थोडं तूप घालून मिक्स करा. आणि लाडू वळा.तीळाचे खमंग कंदी लाडू तयार आहेत.

4. तीळाचे शुगर फ्री लाडू

साहित्य - पाव किलो तीळ १०० ग्राम शेंगदाणे  काजु बदाम व २००ग्रॅम काळा खजुर वेलची जायफळ पुड

कृती - प्रथम तीळ घेवून ते कढईत भाजून घेणे आणि मिक्सरवर बारीक करणे शेंगदाणे भाजुन बारीक करणे काजु बदाम साजुक तुपात परतुन बारीक करणे  खजुरही साजुक तुपात परतुन बारीक करणे आता सर्व बारीक केलेले जिन्न्स एकत्र करुन त्यात साजुक तुप आणि खजुर वेलची जायफळ मिक्स करुन लाडु वळावेत.

5. तीळाच्या मऊ वड्या

साहित्य - तीन वाट्या कुट ( एक वाटी दाण्याचे आणि 2 वाट्या तीळाचे कुट), ५० ग्रॅम मिल्क पावडर, एक वाटी साखर आणि साखर बुडेपर्यंत दूध. पाक दोन तारी झाला की गॅस बंद करुन त्यात दूध पावडर आणि कुट घालावे. पातेल्यात हे मिश्रण थोड्यावेळ ढवळत राहावे. घट्ट झाले की तूप लावलेल्या ताटात थापावे. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात. समजा मिश्रण सैल वाटले तर थोडे कुट अजून मिसळावे. अश्या पध्दतीने केलेल्या मऊ वड्या सर्वांना आवडतील.

तीळाच्या मऊ वड्या

6. तीळाच्या वड्या

साहित्य- एक वाटी पांढरे तीळ,एक वाटी गूळ, चार वेलदोड्यांची पूड

कृती - तीळ मंद आचेवर भाजून घ्यावेत. गूळ मंद आचेवर पातळ करुन घ्यावा.नंतर त्यात तीळ,वेलची पूड घालून ढवळावे आणि तूप लावलेल्या थाळीत ओतावे. थंड होण्यापूर्वी वड्या पाडाव्यात.

7. तीळ पापडी

साहित्य- एक वाटी साखर, एक वाटी तीळ आणि  एक चमचा तूप

कृती - मंद आचेवर एक वाटी तीळ छान खरपूस भाजून घ्यावेत. पोलपाट आणि लाटण्याला तूप लावावे कारण त्यावरच आपण तीळ पापडी थापणार आहोत. साखरेचा पाक तयार करताना कढईत एक चमचा पाणी टाका आणि वाटीभर साखर टाका. गॅस मंद आचेवर ठेवा आणि सतत मिश्रण हलवत राहा. तुम्ही पाहाला काही मिनीटांनी साखरेचा पाक तयार होईल आणि तो लालसर दिसू लागेल. हे मिश्रण सतत हलवत राहणे महत्त्वाचे आहे. साखरेचा पाक तयार झाला की त्यात भाजलेले तीळ घालावेत आणि छान मिश्रण तयार करावे. गॅस बंद करावा. आता हे मिश्रण पोलपाटावर काढून घ्यायचे. गरम असताना त्याची पोळी लाटावी. ती पातळ लाटली जाईल असे पाहा. हे मिश्रण गार झाले तर लाटणे कठीण होते म्हणून गरम असताना लाटून घ्यावे. तीळ पोळी गार झाली की आपोआप पोलपाटा-वरून सुटते. तुम्ही पाहाल छान कुरकुरीत तीळ पोळी तयार होते. साखरेऐवजी तुम्ही गुळ वापरु शकता.

तीळ पापडी

8.गुळाची पोळी

साहित्य - (सारणासाठी) अर्धा किलो गूळ, एक कप बेसन, दोन सुक्या नारळाच्या वाट्या, ३/४ कप तिळ, अर्धा कप शेंगदाणे,अर्धा कप खसखस,अर्धा कप तेल

(आवरणासाठी) दिड कप मैदा ३/४ कप कणिक दोन टेस्पून तेल चिमूटभर मीठ दोन टेस्पून बेसन

कृती -  सुक्या नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. सोनेरी रंग येईस्तोवर कोरडेच भाजावे. हाताने चुरून घ्यावे. हा चुरा आपल्याला १/२ ते ३/४ कप हवा आहे. कमी असल्यास अजून थोडं खोबरं भाजून चुरा करावा. तीळ आणि खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. बारीक पूड करून घ्यावी. शेंगदाणे भाजून त्याची साले काढून टाकावीत आणि एकदम बारीक कूट करून घ्यावा. एका मध्यम पण जाड बुडाच्या पातेल्यात अर्धा कप तेल गरम करावे. त्यात एक कप बेसन खमंग भाजून घ्यावे. गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेले जिन्नस (तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं) गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा. मैदा, कणिक, मिठ आणि बेसन एकत्र करावे. २ टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. लागल्यास थोडे साधं तेल घालावे. १५ मिनीटे झाकून ठेवणे. सारणाचे २३ ते २५ सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे. दोन पिठाच्या लाटयांमध्ये एक सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद कराव्यात. हाताने हलके प्रेस करून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, बाजू पलटू नये. मंद आचेवर तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. ताटात काढून किंचीत गार होवू द्याव्यात. एकदम गरम खावू नये, सारणातील गूळ गरम असल्याने चटका बसू शकतो. गुळपोळी गार किंवा कोमट दोन्हीप्रकारे छान लागते. गुळपोळीवर नेहमी थोडे तूप घालून खावे म्हणजे उष्ण पडत नाही.

गुळाची पोळी

9. शेंगदाणा चिक्की

साहित्य - अर्धा कप साखर, अर्धा कप शेंगदाणे आणि थोडे तूप

कृती - शेंगदाणे भाजून घ्यावे. भाजलेल्या शेंगदाण्यांची साले काढून पाखडून घ्यावेत.पोलपाटाला तुपाचा हात लावून घ्यावा. तसेच जाड सपाट बुडाच्या भांड्याला किंवा वाटीला बाहेरून तूप लावावे. नॉनस्टीक पॅनमध्ये साखर पसरवून घालावी. पाणी घालायचे नाही, नुसतीच साखर घ्यायची. गॅस एकदम मंद ठेवावा. गरज वाटली तर एक चमचा पाणी घालावे. साखर हळूहळू वितळायला लागेल. मग चमच्याने हळूहळू ढवळा. साखर पूर्ण वितळली कि गॅस बंद करा. लगेच त्यात भाजून सोललेले शेंगदाणे घालावेत. लगेच मिश्रण पोळपाटावर घालावे. वाटीने थापावे. ही क्रिया भरभर करावी नाहीतर पाक लगेच कडक होईल. गरम असतानाच सुरीने तुकडे करण्यासाठी मार्क करून ठेवावे. चिक्की गार झाली की तुकडे करावेत

शेंगदाणा चिक्की

10. मुरमुऱ्याचा लाडू

साहित्य - एक मोठी वाटी मुरमुरे, एक वाटी चिक्कीचा गुळ, तीन चमचे तूप आणि थोडी वेलची पूड

कृती - सर्वप्रथम मुरमुरे छान साफ करून घ्या. त्यांना मंद आचेवर थोडं भाजून घ्या. आता मंद आचेवर कढई ठेवून त्यात दोन चमचे तूप गरम घालावे आणि त्यात बारीक चिरलेला चिक्कीचा गुळ घालावा.थोड्यावेळाने गुळ वितळू लागेल आणि त्याचा रंग गडद होईल.आता या पाकात भाजलेले मुरमुरे घालावेत आणि त्यावर वेलची पूड टाकावी आणि छान मिक्स करावेत.गॅस बंद करावा.गरम गरम असतानच छान लाडू वळावेत. हातांना थोडे पाणी लावावे म्हणजे हात भाजणार नाही आणि लाडू पटकन वळले जातील.

मुरमुऱ्याचा लाडू

मकर संक्रातीमध्ये तीळाचे लाडू, वड्या, गुऴाच्या पोळ्या करून आपली मकर संक्रात अधीक गोड करा आणि म्हणा तीळगुळ घ्या गोड-गोड बोला.

अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture

तीळपासून आपण कोणत्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो?
तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. तसंच गुळातही उष्णता असते तीळापासून विविध खाद्यपदार्थ केले जातात.

तीळाचे लाडू

पाक विरहीत तीळाचे लाडू

तीळाचे कंदि लाडू

तीळाचे शुगर फ्री लाडू

तीळाच्या मऊ वड्या

तीळाच्या वड्या

तीळ पापडी

तीळाचे लाडू कसे बनवायचे?
"तीळ मंद गॅसवर भाजून घ्यावे.तडतडू लागले की उतरावे.त्यानंतर सुके खोबरे थोडेसे भाजून घ्यावे.शेंगदाणे भाजून सोलुन घ्यावे आणि जाडसर कुटुन घ्यावे.तीळ, खोबरे, शेंगदाणे एकत्र करून बाजूला करून ठेवावे.एका पातेल्यात थोडेसे तूप घालून त्यावर गूळ घालावा पाणी घालू नये.मंद गॅसवर पातळ होवू द्यावा.एका वाटीत पाणी घेऊन २-३ थेंब पाकाचे घालावे.गोळी झाली की पाक झाला असे समजून त्यातएकत्र केलेले सर्व सामान घालून घ्यावे.वेलची पूड घालून एकत्र करून घ्यावे.तळ हाताला थोडेसे तूप लावून मिश्रण गरमअसतानाच लाडू वळून घ्यावे.थंड झाले की तयार लाडू हवाबंद डब्ब्यात भरून ठेवावे "