दिव्या दिव्या दीपत्कार !

11 minute
Read

Highlights

आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती । झाले इवली मग पणती,घराघरांतून मिणमिणती। समई केले मला कुणी, देवापुढती नेवोनी । निघुनी आले बाहेर, सोडीत काळासा धूर। काचेचा मग महाल तो, कुणी बांधुनी मज देतो । कंदील त्याला जन म्हणती, मीच तयांतिल परिज्योती। बत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज बरवे। वरात मजवाचून अडे, झगमगाट तो कसा पडे। आता झाले मी बिजली, घरे, मंदिरे लखलखली । देवा ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे। एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांला । कसलेही मज रूप मिळो, देह जळो अन्‌ जग उजळो। कवी वि.म. कुलकर्णी यांच्या या कवितेतून दिव्यांत होत गेलेला बदल सांगितला आहे. आपल्या महाराष्ट्रात दिव्यांचे विविध प्रकार आहेत. या दिव्यांच्या प्रकाशाता आपणही उजळून जावूया दिव्या दिव्या दीपत्कार या लेखाद्वारे…



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

'दिवाळी' आणि 'दीप' यांचं अतूट नातं आहे. अंध:काराला नष्ट करून सर्वत्र चैतन्यदायी आशेचा प्रकाश पसरविणारा सण म्हणजे दिवाळी. आपण दिवाळीत कितीही महागड्या वस्तू आणल्या तरी छोटय़ाशा, नाजुकशा पणत्यांशिवाय हा सण पूर्ण होऊच शकत नाही. बाजारात कितीही डिझायनर दिवे येवू दे पणत्यांचा साजिरा बाज कायम आहे.सध्या बाजारात तुम्हाला पणत्यांबरोबरच कुयरी, पान, हत्ती, मोर, तुळशी वृंदावन, फुलं, कमळ अशा वेगवेगळ्या आकारातल्या सुरेख पणत्या, दीपमाळ, हँगिग दिवा पहायला मिळतील. पणती हा दिव्यांचा एक प्रकार आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्राने दिव्यांची खास परंपरा जपली आहे. 

पणती

दीप

संध्याकाळ झाली की अंगणात तुळशीपुढे किंवा देवापुढे दिवा लावून ‘दिव्या दिव्या दीपत्कार…’ ही प्रार्थना आजही घरात म्हटली जाते. मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात दगडमातीच्या पणत्या वापरल्या जात होत्या. पणतीचं धार्मिक,अध्यात्मिक महत्व असून त्रिपुरी पौर्णिमा, दिवाळी सणांमध्ये पणतीचे विविध प्रकार वापरले जातात. कालांतराने त्यात कलाकुसर झाली असून विविध आकार,धातू आणि रंगीत पणत्या बाजारात मिळत आहेत.काही प्रसंगी नदीत सोडावयाचे पणतीच्या आकाराचे पानांचे दिवे केले जातात. पणती विझू नये यासाठी काचेचं आच्छादन असणारे लाकडी, पत्र्याचे, ब्राँझ, पितळेचे पिंजरेही पूर्वी वापरले जायचे. त्यामुळे ज्योतीचं संरक्षण होऊन बराच काळ ती तेवत राहायची. 

आरतीदीप / अर्चनादीप 

हातात धरावयाच्या दीपात निरांजनाप्रमाणे ‘अर्चनादीप’ आणि ‘आरतीदीप’ हे प्रकार येतात. अनेक देवळात तऱ्हेतऱ्हेचे आरतीदीप असतात. आरतीदीप आरती करण्यासाठी वापरत असल्याने त्यांना मूठ असते आणि त्या मुठीवर नक्षीकाम केलेलं असतं. पंचारती त्यातलाच एक प्रकार आहे. पाचवाती असलेल्या नीरांजनास ‘पंचारती’ असं म्हणतात. अशाच एका पंचारतीत पाच सुहासिनींनी पाच आरत्या घेतल्या असून त्यामागे एक घोडेस्वार म्हणजे खंडोबा आहे. एका शेषाकार पंचारतीत टोकाला एक मार्गदर्शक वात तर खालील बाजूस पाच वातींसाठी पाच चोची केल्या असून त्यावर पाच नागांनी फणा धरलेला आहे असे प्रकार आपल्याला पहायला मिळतील. सप्तपंचारती, नवपंचारती, विष्णूपंचारती असे प्रकारही सांगितले जातात. 

निरांजन

हा लहान आकाराच्या दिव्याचा एक प्रकार आहे. याचा आकार डमरूसारखा असून बुडाचा भाग तेल वा तूप ठेवण्याच्या भागापेक्षा मोठा असतो. बहुतेक नीरांजनांमध्ये वरचा भाग खालच्या भागापेक्षा मोठा असतो. वरच्या भागात वात, तेल अथवा तूप घालतात आणि जळण्यासाठी वातीचे टोक कडेवर ठेवतात. पितळ, चांदी,स्टेनलेस स्टील धातूपासून नीरांजन तयार केलं जातं. निरांजनात वाटी निरांजन असा प्रकार असून दोन वाटी निरांजन लावण्याची पद्धतही आहे. दिवाळीत काही घरांमध्ये ‘कुबेर निरंजन’ लावलं जातं. या निरांजनच्या कडा नक्षीदार असून एका बाजूला टोक असतं जिथून वातीला प्रज्वलीत केलं जातं. ‘कुबेरवाटी दीप’ आणि ‘कुबेर दीप’ असाही प्रकार यात असतो. अनेक वाती असलेली नीरांजने धरण्यासाठी त्यांना विविध आकारांच्या मुठी असतात. नीरांजनाचे उपयोग धार्मिक उत्सवाच्या वेळी, पूजेच्या वेळी, औक्षणाच्यावेळी करतात

नंदादीप 

पूर्वीच्या काळी नंदादीपाचा वापर देवळांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असे. जो अखंड तेवत राहतो त्याला ‘नंदादीप’ असं म्हटलं जातं. याचा आतला भाग खोलगट असतो. प्राचीन काळी दगड कोरून हा दिवा तयार केला जायचा. त्यानंतर काही भागात मातीपासून तयार केलेले दिवे वापरले जाऊ लागले.शंकराच्या देवळात अखंड तेवत राहणारा दिवा असतो त्याला नंदादीप म्हणतात.नवरात्रात देवीसमोर अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. अखंडनंदादीप, पद्मनंदादीप, मयुरनंदादीप, अष्टज्योती नंदादीप, मंगलनंदादीप, नंदादीप समई असे नंदादीपाचे प्रकार सांगितले जातात.

लामणदिवा

लामणदिवा

लामणदिवा हे महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य आहे. काही समईंना दंडाकार भागापासूनचा खालचा सर्व भाग नसतो. त्याऐवजी वरच्या भागाच्या मध्यभागी साखळी असून ती टांगता येते. यांना टांगते दिवे असे म्हणतात. ‘लामण दिवा’ हा यांपैकीच एक टांगता दिवा होय. टांगत्या दिव्यात वक्राकार गतीने तेल पुरविणाऱ्‍या स्त्रीच्या आकृतीचा वापर यात केलेला आढळतो. कीर्तिमुखदीप, वैष्णवदीप, मयूरदीप, शंखदीप, कपोतदीप, कमलदीप, हस्तिदीप, कमानदीप, शुकदीप असे विविध कलात्मक प्रकार यांत आहेत. टांगत्या दिव्यांच्या प्रकारात मुख्यतः लामणदिव्यांचा समावेश होतो. या दिव्याचा आकार कमलपत्रसदृश असून त्यात अनेक वाती लावता येतात. तसेच त्याची साखळी मनोवेधक असते. देवळांमध्ये किंवा ज्यांच्या घरात मोठं देवघर आहे तिथे लामणदिवा आपल्याला आवर्जून दिसेल. लग्न समारंभात बोहल्यावर वधू-वरांच्या मागे करवली रोवळीत लामणदिवा घेऊन उभी राहते. त्यावेळी त्याला ‘शकुन दिवा’ म्हणतात. आकाशदीप आणि वृंदावनदीप हेसुद्धा टांगत्या दिव्याचेच प्रकार आहेत. एखाद्या कलात्मक जाळीच्या पिंजऱ्यात एक पणती ठेवून तो तुळशीवृंदावनाजवळ टांगतात. जाळीमुळे नक्षीदार छायाप्रकाश पसरतो. मोगलकालीन लामणदिवे तर याहीपेक्षा कलात्मक होते. त्यांच्या वरच्या भागावर मिनारीच्या आकाराची सजावट असते, तसेच दिव्याच्या चारी बाजूंना सुबक नक्षी केलेली असते, त्यामुळे जाळीदार प्रकाश पडत असे. दीप देवताभ्यो नमः असं दीप लावताना म्हटलं जातं.

समई

समई

पूर्वी घर आणि देवळांमध्ये प्रकाशासाठी समईचा वापर केला जात होता. हल्ली तिचा उपयोग फक्त देवघरात आणि देवळात करण्यात येतो. लक्ष्मीपूजनाला किंवा सत्यनारायणाच्या पुजेत समई आर्वजून ठेवली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिरात तुम्हाला समई दिसेल आणि ती अखंड तेवत असते. कोणताही उद्घाटन सोहळा असेल तर समई प्रज्वलीत केली जाते.पर्शिअन भाषेतील ‘सम’ या शब्दापासून समई हा शब्द आला असावा असं म्हटलं जातं.समईत एकाचवेळी अनेक वाती लावल्या जातात. काही समई या अखंड असतात, तर काहींचे तीन सुटे भाग असतात.सुरेख कलाकुसरीच्या छोट्या आणि अगदी चार-पाच फुटी उंच अशी समई असते. काही मंदिरात घाटदार स्त्रीचा आकार, गजारूढ, कमलासनाधिष्ठित अशी कलात्मकता लेवून येते जी समई तेवत असते तीला "दीपलक्ष्मी‘. म्हणतात. ‘मयूर’, ‘मनोरा’ आणि ‘पंचमनोरा समई’ असे प्रकार सांगितले जातात.पितळी, चांदी, स्टेनलेसस्टीलच्या धातूपासून समई तयार केली जाते. सध्या तर विजेचे दिवे बसविलेल्या लहान आकारमानाच्या प्लॅस्टिक किंवा लाकडाच्या समई मिळतात. 

दीपस्तंभ 

देवालया समोरील दगडात कोरलेला, लाकडी किंवा पितळी धातूचा "दीपस्तंभ‘ प्रकाशवाट दाखवत असतो असं म्हणतात. दिवाळीत देवळासमोरील दीपस्तंभ प्रज्वलीत केले जातात. तसं पाहिले तर दीपवृक्षाचे दोन प्रकार आहेत. एक निमुळता होत गेलेला "शंखाकृती‘तर दुसरा"अश्‍वत्थ‘ वृक्षासारखा अनेक पसरट फांद्यांचा, कमलपत्राच्या आकाराच्या असतात.बऱ्याच दीपस्तंभांवर गतिमान प्रकाशाचं द्योतक असलेला हंस आढळतो. पाना-फुलांची नक्षी, कमळ, मयूर, अश्‍व, गज, सिंह, नाग, लक्ष्मी अशा सांकेतिक प्रतिमाही विविध प्रकारच्या दिव्यांवर आढळतात. 

पलिते, मशाल, दिवटी, काकडा

पलिते, मशाल, दिवटी, काकडा हा हात दिव्यांचा प्रकार आहे.महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक घटनांचे हे दिवे साक्षीदार आहेत. बऱ्याच किल्ल्यांवर, तटबंदीत मशालकऱ्यांसाठी खास जागा असत. पेटते पलिते बैलांच्या शिंगांना बांधून शत्रूची दिशाभूल केल्याची उदाहरणे आहेत. घरातल्या भिंतीतील कोनाड्यात, खुंटीवर, तुळई-खांबांच्या कड्यांना, देवळातील सभा मंडपातील भिंतींवर प्रकाशासाठी चिमणी, कंदील, बत्ती, रामादान अशा प्रकारची दीपपात्रे असतं. यातील काही दिव्यांवर वृषभ, अश्‍व, हत्ती, गजलक्ष्मी यांच्या प्रतिमा असतात. 

चिमणी/कंदील/आकाशकंदील

आकाशकंदील

मराठी हिंदी चित्रपटातून अनेकदा कंदील किंवा चिमणीचं दर्शन होतं. पूर्वी पणती, चिमणी किंवा कंदिल पेटवूनच त्याच्या प्रकाशात घरकाम केलं जात असे. या कंदिलाची वात विझू नये म्हणून त्याभोवती काच असे. ती हळूच वर उचलता येण्यासाठी व्यवस्थाही केलेली असे. त्यालाच ‘चिमणी’ म्हणत. तर कंदिलाला वर एक लांब गोलाकार कडी असे. जी हातात धरून कंदील हवा त्या ठिकाणी नेता येई तसंच भिंतीवरही टांगता येई. वारा, पाऊस आणि इतर गोष्टींपासून ज्योतीचं संरक्षण होईल अशीच या कंदीलाची रचना असे. त्यामुळे चिमणीपेक्षा कंदील अधिक लोकप्रिय झाला. रेल्वे, बोटींना दिशा दाखवण्यासाठी, थांबवण्यासाठी कंदिलाचाच वापर केला जाई. कंदिलाचाच एक प्रकार म्हणजे आकाश कंदील. अगदी बरोबर दिवाळीत आपणही आकाशकंदील लावतो. आकर्षक कागद, कापड वापरून आकाशकंदिल केले जातात.

या दिव्यातील सौम्य प्रकाशानं मनात सात्विकता निर्माण होते. मंदिराच्या प्रवेशद्वारातील दीपस्तंभ, आतल्या मंडपातील भिंतीवरचे दिवे, लामणदिवे आणि गाभाऱ्यातील समई, निरांजन अशा क्रमानं येणारे दिवे मनाला विचारांना चढत्या क्रमानं दिशा देतात, शांतता- समाधान देतात आणि व्यवहारी जगात अडकलेलं मन हळूहळू आनंदी, प्रसन्न आणि शांत होत जातं.यंदाच्या दिवाळीतंही आपलं घर पणती, दिवे यांनी प्रज्वलीत करून प्रकाशाचा सण आनंदाने उत्साहाने साजरा करा. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा….

आपल्याकडील विविध दिव्यांचे प्रकार पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

 अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture
Response(s) (1)