'मेनोपॉज'मध्ये वजन का वाढतं?

5 minute
Read

Highlights 'मेनोपॉज' हा कोणताही विकार अथवा आजार नाही.ही महिलांच्या आयुष्यातील एक स्थिती असून या काळात माहिलांची मासिक पाळी येणे बंद होते.या काळात वजन वाढीची समस्या वाढते. वाढलेलं वजन कमी करणे हे महिलांसाठी मोठे आव्हान ठरते. अशावेळी काय करावे? आपली जीवनशैली कशी असावी? म्हणजे 'मेनोपॉज' दरम्यान वजन वाढणार नाही.या लेखात तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल.

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

'मेनोपॉज' अर्थात 'रजोनिवृत्ती' म्हणजे महिलांना येणारी मासिक पाळी पूर्णपणे बंद होणे. साधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षामध्ये पोहोचल्यानंतर महिलेला मेनोपॉज येऊ शकतो. यादरम्यान शरीरातील हार्मोनमध्ये बरेच बदल घडतात. मासिक पाळी येणे बंद होणे म्हणजे रजोनिवृत्तीच्या अवस्थेमध्ये शरीरावर कित्येक प्रकारचे दुष्परिणामही पाहायला मिळतात. उदाहरणार्थ वजन वाढणे, मूड सतत बदलणे आणि हार्मोन असंतुलित होणे, इत्यादी…मग यासाठी काय करायला हवे, चला वाचूया…

मेनोपॉजमध्ये वजन का वाढतं?

* मेनोपॉजमध्ये वाढणारं वजन प्रामुख्याने पोट आणि मांड्या येथे वाढतं. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हे होतं. इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी झालेलं असतं, प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे  वजन झपाट्याने वाढतं.

* त्याचप्रमाणे वय वाढतं तसं स्नायूंच्या जागी मेद वाढायला लागतो.  वजन वाढत असतानाही आहारात  बदल केला नाही, कुठलाही व्यायाम केला नाही  तर वजन वाढणारच. हे सगळं घडतं कारण नैसर्गिक मार्गानंं शरीरातली चरबी वापरली जात नाही.ती साचून राहते. 

* त्यातच अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्यावर ताबा नाही,  हे सगळं एकत्रित असेल तर वजनाचा काटा कायमच उजवीकडे झुकत राहणार.

अशा परिस्थिती वजन कमी करणे महिलांसाठी मोठे आव्हान ठरू शकतं. दरम्यान पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदलांमुळे महिला अतिरिक्त वजन घटवू शकतात.

आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश

पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त शरीराचे वजन कमी करण्यामध्येही फायबर महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. यासाठी आपल्या डाएटमध्ये स्प्राउट्स, अळिवाच्या बिया, अ‍ॅव्होकाडो, ब्रोकली आणि सॅलेडचा समावेश करावा.

नियमित व्यायाम करा

शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे देखील आळसपणा वाढतो. नियमित व्यायाम केल्यास शरीरातील आळस दूर होऊन तुम्हाला प्रसन्न वाटेल. यामुळे वजन देखील कमी होईल आणि शरीराचे स्नायू सुद्धा मजबूत होतील. तसंच स्नायूंचा विकासही योग्य पद्धतीने होतो.

पुरेशी झोप महत्त्वाची 

अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील हार्मोन असंतुलित होणे (Hormonal imbalance) आणि चयापचयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पुरेशा प्रमाणात झोप न घेतल्यास काही लोकांच्या शरीराचे वजन वाढते. तुमचे देखील वजन वाढत असल्यास यामागील प्रमुख कारण अपुरी झोप असू शकते. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ नये, यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. शिवाय अन्य शारीरिक समस्या देखील निर्माण होणार नाहीत.

जीवनशैलीमध्ये बदल करा 

आरोग्य निरोगी राहावे, यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणं आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम करणं, स्वच्छ- पौष्टिक आहाराचे सेवन करावे आणि वेळेवर झोपावे तसंच सकाळी उठावे. अशा प्रकारे आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणल्यास शरीराचे वजन नियंत्रणात राहीलच शिवाय अन्य विकारांपासूनही आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत मिळू शकते.

लक्षात ठेवा

  • धान्य, फळं, भाज्या, प्रथिनं हे घटक आहारामधे असायलाच हवेत.
  • प्रोसेस्ड फूड टाळायला हवेत.
  • आपली फूड डायरी तयार करावी. आपण रोज काय खातो याच्या नोंदी ठेवाव्या. आपला आहार नेमका कसा आहे यावर लक्ष ठेवायला  त्याचा उपयोग होऊ शकतो.
  • रात्री उशिरा जेवण करू नये.
  • जेवताना छोटे छोटे घास खा. बकाबका किंवा कोंबून खाऊ नका.
  • मद्यप्राशन कमी करा.
  • टेन्शन घेवू नका, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा

एकच गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आपलं आपल्या वजनावर लक्ष हवंच. जर वजन वाढतंय असं लक्षात आलं तर जीवनशैली आणि आहार यात बदल करावा. आणि पुढे हा बदल आयुष्यभर जपायला हवा. समजा तुम्हाला वाटलं आहारात बदल करूनही फरक पडत नाही तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

अनिता किंदळेकर 

Logged in user's profile picture