मॉमप्रेन्युअर्सच्या कर्तृत्वाला सलाम !!

10 minute
Read

Highlights ‘आई माझा गुरू, आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे या शब्दात साने गुरूजींनी आईची महिती स्पष्ट केली आहे. तर बाबा आमटेंसाठी ‘आई एक उत्तम शिक्षिका असून तीच आपले सर्वस्व घडविते असे त्यांनी म्हटले आहे. आई जेव्हा घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडते आणि स्व-कर्तृत्वाने नोकरी-व्यवसाय करते तेव्हा ती काय करु शकते हे स्पष्ट होतं. स्वप्नपूर्तीसाठी भरारी घेत असताना ती घराकडे किंवा मुलांकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. संगोपन आणि करीअरची घडी व्यवस्थीत बसवून यशाचं एक एक शिखर चढत असते आणि तसेच संस्कार मुलांवर करते. या आईमुळेच पुढची येणारी पिढी कर्तृत्वान असणार यात शंकाच नाही. आपल्या देशात अनेक मॉमप्रेन्युअर्स आहेत ज्यांच्या कर्तृत्वाचा डंका आझ जगात गाजतोय. मदर्स डे निमित्त या काही खास मॉमप्रेन्युअर्सची ओळख आपल्यासाठी…

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

आजच्या जगात महिला यशस्वीपणे त्यांचं ध्येय साध्य करून स्वतःची स्वप्ने पूर्ण करत आहेत. मुलांची काळजी घेणे ते व्यवसायाच्या ट्रेंडमध्ये आपली पकड मजबूत करणे, प्रत्येक आघाडीवर महिलांनी स्वतःला सिद्ध केलंय. स्त्री-पुरुष असमानता मागे ठेवून राष्ट्र उभारणीसाठी मॉमप्रेन्युअर्सनी आपल्या नाविन्यपूर्ण  कल्पनांसह अनेक चौकट मोडून यशस्वी वाटचाल सुरु केलीय. ती आई आहे त्याचबरोबर ती सगळ्यांचा आदर्श आहे. तिच्या कर्तृत्वाने तिने स्वतःच विश्व उभं केलं आहे. ८ मे अर्थात मदर्स डे निमित्त मॉमप्रेन्युअर्सच्या कर्तृत्वाला आमचा सलाम !!

मीना बिंद्रा ‘बीबा’च्या निर्मात्या

घरात वेळ जात नाही म्हणून टाईमपाससाठी आपल्या घरातून कपड्यांची विक्री करणारी महिला आज वर्षाला ५०० कोटी रूपयांचं उत्पन्न मिळवते. हे वाचून आश्चर्य वाटलं असेल पण हा प्रवास आहे ‘बीबा’च्या निर्मात्या मीना बिंद्रा यांचा. बँकेंकडून आठ हजार रूपयांचं कर्ज काढून सुरू केलेल्या या व्यवसायाला मीना यांनी एका ब्रँडचं रूप दिले. विशेष म्हणजे या ब्रँडनं देश-विदेशातील नागरिकांना एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिलाय. अवघ्या १९ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. २० वर्षे घर आणि मुलं हेच त्यांचे विश्व होतं पण मुलं मोठी झाल्यानंतर आता काय करावं म्हणून त्यांनी सलवार सुट तयार करून त्याची विक्री करायला सुरुवात केली.  बँकेकडून कर्जाच्या रूपात मिळालेल्या रकमेद्वारे त्यांनी महिलांसाठी २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे आकर्षक सलवार-सूटचे ४० सेट तयार केले आणि घरीच त्यांची विक्री सुरू केली. पंजाबीमध्ये मुलींना प्रेमाने ‘बीबा’ म्हणतात म्हणून त्यांनी ब्रँडचे नाव ‘बीबा’ ठेवले. आज तयार कपड्यांच्या उद्योगात बीबाने स्वतःची खास ओळख जपलेली आहे. ‘जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर त्यासाठी जगा’ असे म्हणत मीना बिंद्रा यांनी काम सुरु केले आणि छोट्या रोपाचा आज वटवृक्ष झालाय. मीना बिंद्रा म्हणजे अनेक मॉमप्रेन्युअर्ससाठी प्रेरणास्थान आहेत.

सुची मुखर्जी 'लाईमरोड'ची संस्थापिका 

लाईमरोडची संस्थापिका असलेल्या या भारतीय महीलेने आपल्या औद्योगिक प्रवासाची सुरुवात २०१२ मध्ये केली. तेव्हा ती प्रसुती रजेवर होती. दुसर्‍या बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्या मॅगझिन वाचत होत्या तेव्हा त्यांना बिझनेस कल्पना सुचली. सुची मुखर्जी या हरियाणा मध्ये त्यांचे पति आणि दोन मुलांबरोबर राहतात. १९९८ साली त्यांनी लेहमॅन ब्रदर्स या कंपनीसोबत आपल्या करिअर ची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी वर्जीन मिडीया या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम सांभाळंल त्यांनी ईबे, स्काइप ,गम-ट्री यासारख्या कंपन्यांबरोबर सुध्दा काम केले आहे. लाइमरोड ही एक ऑनलाइन फॅशन , जीवनशैली आणि अ‍ॅक्सेसरीज मध्ये काम करणारी कंपनी आहे.

विनीता सिंह ‘शुगर’ कॉस्मेटिक्सच्या सीईओ 

प्रसिद्ध मॉमप्रेन्युअरपैकी एक आहे विनीता सिंह, शुगर या स्वदेशी कॉस्मेटिक्स ब्रँण्डच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.विनीताने २०१२मध्ये या कंपनीची स्थापना केली. विनीता दोन मुलांची आई असून व्यवसाय उद्योगात त्यांनी उंच भरारी घेतलेली आहे. आयआयटी मद्रास येथे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विनीताने आयआयएम अहमदाबाद येथे व्यवसायाचे शिक्षण पूर्ण केले. ‘तुमचा निर्धार पक्का असेल तर कोणत्याही संकटाचा सामना तुम्ही करु शकता’ हे शुगरच्या सीईओ विनीताने सिद्ध करून दाखवलं. भारतीय त्वचेला अनुरुप असणारी उत्पादने शुगर कंपनी तयार करते. सध्या शुगर कंपनीची कोट्यवधीमध्ये उलाढाल असून परदेशातही शुगर कंपनीची उत्पादेन वापरली जातात.

गझल अलघ ‘मामाअर्थ’ची सहसंस्थापक

एक मुलाची आई असणारी गझल अलघ ही मामाअर्थची सहसंस्थापक आहे. गझल जेव्हा आई झाली त्यावेळी बाळासाठी केमिकल विरीहीत उत्पादनांचा तिने खूप शोध घेतला पण तिला काही सापडले नाही. त्यातूनच टॉक्सिन फ्री बेबी प्रोडक्टचा जन्म झाला. २०१६ मध्ये पतीसोबत तिने केमिकल विरहीत बेबी केअर उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर मामाअर्थची त्वचा आणि केसांसाठी विविध उत्पादने बाजारात आहेत. शार्क टँक इंडिया या बिझनेस रिऍलीटी शोमधील एक शार्क म्हणून ती ओळखली जाते. यशस्वी महिला उद्योजिका म्हणून तिचा डंका साता समुद्रापार गेलाय. गझल एक आई म्हणूनही आपली जबाबदारी उत्तमरित्या सांभाळते आहे. 

नमिता थापर 'एमक्युअर' फार्मास्युटिकल्सची सीईओ

नमिता मुळची पुण्याची असून भारतातील आघाडीच्या व्यावसायिक महिलांपैकी एक आहे. एमक्युअर फार्मास्युटिकल्स या पुणे, महाराष्ट्र येथील भारतीय बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स कंपनीची ती सीईओ आहे. व्यावसायिक जगतात प्रसिद्ध महिला उद्योजिका म्हणून ती ओळखली जाते. तसेच  शार्क टँक इंडियामध्ये गुंतवणूकदार म्हणून नमिता प्रसिद्धी झोतात आली. जगभरात तिच्या कंपनीच्या जाळे विणलेले आहे.या कंपनीची  उलाढाल 6,000 दशलक्ष रुपये आहे. वडिलांकडून प्रेरणा घेत तिने व्यवसायाला सुरुवात केली होती. एक प्रसिद्ध उद्योजिका त्यासोबत  ती दोन मुलांची आई आहे. दोन मुलांचे संगोपन आणि करीअर याचा समतोल तिने व्यवस्थितपणे सांभाळला आहे. वैद्यकीय उपकरण कंपनी, गाइडंट कॉर्पोरेशन, यूएसए येथे नमिताने काम केले. तेथे तिने 6 वर्षे फायनान्स लीडर म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर वडिलांचा व्यवसाय, एमक्युअर फार्मास्युटिकलमध्ये मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून रुजू झाली. सध्या ती तिथे कार्यकारी संचालक आहे. या कंपनी मार्फत ती भारतीय व्यावसायीकांना गुंतवणुकीसाठी मदत करते. भारतातील होतकरू आणि व्यवसाय करु इच्छिणा-या तरुण, तरुणींना मार्गदर्शनाचेही काम करते.

राधिका घई-अग्रवाल 'शॉपक्लूज'ची सह-संस्थापक 

राधिका घई अग्रवाल म्हणजे इंटरनेट उद्योजक आणि युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश करणारी भारतातील पहिल्या महिला होय.२०११ मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्थापन झालेल्या शॉपक्लूज या ऑनलाइन मार्केटप्लेसची त्या सह-संस्थापक आहेत.सध्या त्या कंपनीच्या मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून काम करतात. राधिका यांना रिटेल, ईकॉमर्स, फॅशन आणि जीवनशैली, जाहिरात आणि जनसंपर्क अशा विविध उद्योगांमध्ये मार्केटिंगचा दहा वर्षांचा अनुभव आहे.या अनुभवाच्या आधारे त्यांनी शॉपक्ल्यूज डॉट कॉमची सह-स्थापना केली.राधिका यांनी न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या मेनलो पार्क येथे असलेल्या संपत्ती व्यवस्थापन गटात गोल्डमन सॅक्सबरोबर काम केले आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशनमध्ये एमबीए केले. दोन मुलांची आई असणाऱ्या राधिका यांनी आयुष्यात अनेक उतार चढाव पाहिले पण जिद्द आणि मेहनतीने त्यांनी यशस्वी घोडदौड केलेली आहे. 

वंदना लुथरा VLCC च्या संस्थापिका 

वंदना लुथरा या VLCC हेल्थकेअर लिमिटेड च्या संस्थापिका आहेत. सौंदर्य, फिटनेस,अन्न, न्युट्रीशन आणि त्वचेची काळजी यात त्या पारंगत आहेत. जर्मनी , युके, फ्रान्समधून त्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे. नवी दिल्ली येथे १९८९ मध्ये वंदना यांनी VLCC ची सेवा सुरु केली आणि आता त्या ३२६ पेक्षा जास्त स्थानांमध्ये, १५३ पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि १३ देशांमध्ये त्यांचा बिझनेस पसरलाय. दोन मुलींची आई असणाऱ्या वंदना यांनी घर, संसार, मुलांची जबाबदरी सांभाळून उद्योगात उंच भरारी घेतलेली आहे. 

निधी बत्रा 'निर्वाणा'च्या सह-संस्थापक

निधी बत्रा निर्वाणा सहलीच्या सह-संस्थापक आहेत. दोन मुलांची आई असणाऱ्या निधीने २०१३ मध्ये निर्वाण सहलीचा उपक्रम सुरु केला होता. प्रवासाच्या खास अनुभवासाठी निर्वाण सहल ओळखली जाते. कार्डिफ युनिव्हर्सिटी, वेल्स (यूके) येथून त्यांनी आंतरराष्ट्रीय पत्रकारिता या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. एनडीटीव्हीमध्ये निर्माता म्हणून काम केले पण मीडियाच्या पलीकडचं विश्व त्यांना खुणावत होतं त्यामुळे निधी यांनी ट्रॅव्हेलिंग एजन्सीचा उपक्रम सुरु केला. एक यशस्वी उद्योजिकेसह निधीने काम आणि घर यांच्यात चांगलाचं संतुलन ठेवलेलं आहे. 

सतत प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही हे या मॉमप्रेन्युअर्सनी सिद्ध केलं आहे. आई या शब्दाचा अर्थ काय आहे तर आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचा आत्मा म्हणजे आई म्हणूनच म्हणतात,  

ना संपणार तुझे अस्तित्व , ना तू विरळ होणार

तुझवाचून हे विश्व आपुले, किती काळ टिकणार.......

 

अनिता किंदळेकर 

Logged in user's profile picture