गंमत गोडा मसाल्याची, चव वाढवे खाद्यपदार्थांची !!

6 minute
Read

Highlights मसाला..स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक, म्हणून तर घराघरात मिसळीचा किंवा मसाल्याचा डबा असतोच. तुम्ही कधी स्वयंपाकघरात जावून मसाल्याच्या पदार्थांची चव घेतली आहे का? काही कडू, काही तुरट, काही मातकट तर काही जळजळीत अशी साधारण चव असते. पण जेव्हा हे मसाले एकत्र केले जातात तेव्हा मात्र हेच मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांची रुची द्विगुणीत करतात. विविध मसल्यापैकी महाराष्ट्रीय खाद्यपदार्थात विशेष वापरला जाणारा मसाला म्हणजे गोडा मसाला….कसा तयार होतो गोडा मसाला? त्याचे वैशिष्टय, तो तयार करताना काय काळजी घ्यावी? यासाठी चला तर वाचूया….

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

मसाला…भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये मसाल्याचे स्थान फार महत्त्वाचे आहे. मसाल्यामुळे खाद्यपदार्थांना खास चव येते. खाद्यपदार्थ मग तो शाकाहारी असो वा मासांहारी कोणते ना कोणते मसाले नक्कीच वापरले जातात.आपल्याकडे प्रांता प्रांतात भाषा बदलते अगदी त्याचप्रमाणे मसाल्याची चव देखील बदलते. मुंबई-पुण्यात मालवणी मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, कोल्हापूरचा कांदा-लसूण मसाला, नागपूरचा वऱ्हाडी मसाला असे अनेक प्रकार सांगता येतील. आता एव्हढं मसाला पुराण सुरु केलंय म्हणजे तुम्ही ओळखलं असेल कोणता तरी मसाला नक्कीच तयार होणार आहे. आपण बघणार आहोत गोडा मसाल्याची रेसिपी. तयार करायला अगदी सोपा, तीस मिनीटात तयार होणारा.

goda masala with a hand museli

सौ. संध्या रमेश गड्डम यांनी आपल्याला गोडा मसाल्याची रेसिपी सांगितली आहे. त्यात कन्येने म्हणजे सौ.अश्विनीने सुद्धा हातभार लावलाय.संध्या ताईंचं वैशिष्टय म्हणजे त्या घरीच मसाले तयार करतात. पिढ्यानं पिढ्या चालत आलेला वारसा, ती चव त्यांनी जपली आहे.संध्याताई सांगतात, 'घरी केलेला पदार्थ ताजा आणि स्वच्छतेच भान ठेवून केला जातो. बाजारात मसाल्याचे भाव आपल्या पाकिटाला त्रास देतात, त्याचबरोबर ते किती शुद्ध आहेत ते समजत नाही. पण जर हेच मसाले तुम्ही घरी केले तर परवडतात. शेवटी घरची चव ती घरची चव असते. मसाला जरी असला तरी आईची माया आणि प्रेम त्यात असतं.’

two ladies holding maharashtrian speciality goda masala

मसाला तयार करताना लक्षात ठेवायचे मुद्दे

• मसाल्याचे पदार्थ भाजताना गॅस मंद आचेवर हवा.
• प्रत्येक पदार्थ मग तो कितीही कमी प्रमाणातला असून दे वेगवेगळा भाजायचा.
• मसाला मिक्सरमधून काढल्यानंतर तो चाळून घ्या.
• जो गाळ शिल्लक राहतो त्याला पुन्हा मिक्सरमधून काढा.
• मसाला काचेच्या बरणीत झाकण घट्ट लावून ठेवावा.

ingredients of goda masala

गोडा मसाला साहित्य

५०० ग्रॅम धणे

एक सुक्या खोबऱ्याची वाटी

(खोबऱ्याचे काप करुन घ्या. भाजणे आणि वाटणे सोपे जाते.)

१०० ग्रॅम पांढरे तीळ

२५ ग्रॅम हिंग पूड

१०० ग्रॅम जीरे

२५ ग्रॅम शहाजीरे

५ ग्रॅम लवंग

५ ग्रॅम दालचिनी

१० ग्रॅम तमालपत्र

१० ग्रॅम दगडफुल

अर्धी वाटी तेल

अर्धा चमचा मीठ

कृती

1. कढई घ्या ती मंद आचेवर ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला. तेल तापलं की त्यात लवंग घाला. त्याचा रंग बदलेल आणि एक वेगळा सुगंध तुम्हाला येईल म्हणजे समजावे लवंग छान भाजले आहे.

2. या प्रकारे दालचिनी,जीरे आणि शहाजीरे कढईत तेल घालून भाजून घ्या.

3.  दगडफुल, तेजपान आणि खोबऱ्याचे काप वेगवेगळे कढईत भाजून घ्या.

4. आता पांढरे तिळ भाजून घ्या. तिळ भाजताना उडतात त्यामुळे काळजी घ्या. त्यांचा तडतड आवाज आला की समजायचं तीळ भाजत आले आहेत. हलकासा तिळाचा रंग बदलायला हवा.

5. सर्वात शेवटी धणे भाजायला हवेत कारण त्यांचे प्रमाण जास्त आहे.

6. खडे मसाले भाजले की एका ताटात ते थंड होवू द्या.

7.आता प्रत्येक भाजलेला खडा मसाला शक्यतो वेगळा घेवून मिक्सरमधून वाटून घ्यावा.

8. धणे शेवटी मिक्सरमधून काढावेत कारण त्यांचे प्रमाण जास्त आहे.

9. आता हे पावडर केलेले खडे मसाले एका मोठ्या पातेल्यात घ्या म्हणजे मिक्स करणे सोपे जाते.

10. आता पुन्हा कढई मंद आचेवर ठेवा. कढईत छोटा चमचा तेल घाला. आपल्या साहित्यात फक्त हिंग भाजायचा राहून गेला होता. तेल गरम झाल्यावर हिंग भाजून घ्या. हिंग पटकन भाजतो त्यामुळे तो करपणार नाही याची काळजी घ्या. भाजलेला हिंग आपण जी खड्या मसाल्यांची पावडर केली आहे त्यात घाला.

11. मोठं पातलं घेवून आपला मसाला छान मिक्स करून घ्या. आता त्यात अर्धा चमचा मीठ घालून एकत्र करा. अशा प्रकारे आपला घरगुती गोडा मसाला तयार आहे.

हे सर्व पदार्थ एकत्र करुन साधारण ३०० ग्रॅमच्या आसपास गोडा मसाला तयार होतो.शेंगाची भाजी, भरली वांगी, वालाच बिरडं, आमटी किंवा जी मंडळी लसूण-आलं जेवणात फारसं वापरत नाही त्यांच्यासाठी उत्तम आहे गोडा मसाला. गोडा मसाला झटपट तयार होतो. कधीतरी बदल म्हणून तयार करुन पाहा त्याचा वेगळेपणा खाद्यपदार्थात जाणवेल यात शंकाच नाही.

अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture

गोडा मसाला तयार करण्यासाठी आवश्यक मुद्दे

मसाल्याचे पदार्थ भाजताना गॅस मंद आचेवर हवा.

प्रत्येक पदार्थ मग तो कितीही कमी प्रमाणातला असून दे वेगवेगळा भाजायचा.

मसाला मिक्सरमधून काढल्यानंतर तो चाळून घ्या

जो गाळ शिल्लक राहतो त्याला पुन्हा मिक्सरमधून काढा

मसाला काचेच्या बरणीत झाकण घट्ट लावून ठेवावा

गोडा मसाला साठी लागणारे साहित्य

धणे

एक सुक्या खोबऱ्याची वाटी

पांढरे तीळ

हिंग पूड

जीरे

शहाजीरे

लवंग

दालचिनी

तमालपत्र

दगडफुल

तेल

मीठ