१० योजना ज्या प्रत्येक महिला उद्योजिकेला माहीत असायलाच हव्यात

15 minute
Read

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

भारताची उद्योजकता नवीन कल्पना आणि विविध विषयांवरील कल्पनात्मक व्यावसायिक उपायांनी नटलेली आहे. भारताच्या 'स्टार्टअप इकोसिस्टम' मध्ये महिला उद्योजक आता सर्वत्र आढळतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि अनेक बँका महिला उद्योजकांसाठी तारण सुरक्षा, व्याज दर इत्यादी बाबतीत थोड्या वेगळ्या आणि अधिक लवचीक अटी आणि शर्तींसह विशेष कर्ज देतात.

उद्योजक होण्याच्या बाबतीत महिलांना घरात आणि समाजात अडथळ्यांना तोंड द्यावे लागत असले तरी, भारतात सध्या यासाठी सर्वोत्तम काळ सुरु आहे. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे सोपे व्हावे या उद्देशाने सरकारने प्रयत्नांची घोषणा केली आहे. येथे सर्वोत्तम १० स्टार्टअप योजना आहेत ज्यांचा वापर तुम्ही एक महिला उद्योजक म्हणून तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी करू शकता:

१.  महिला उद्योजकता मंच (WEP)

भारत सरकारने, नीती आयोग च्या माध्यमातून, महिला उद्योजकता मंच सुरू केला आहे, जो महिला उद्योजकांना आणि त्यांना मदत करण्यास उत्सुक असलेल्या प्रायोजकांना एकाच ठिकाणी एकत्र आणतो. तुम्ही नवोदित महिला उद्योजिका असाल, तर समान आवडी असलेल्या आणि समुदाय आणि नेटवर्क तयार करणाऱ्या महिलांच्या या गटात सामील होण्यासाठी तुमचे स्वागत आहे.

WEP मध्ये, ते पुढील गोष्टी करतात: व्यवसायांसाठी त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक ओळख करून देणे आणि मग गतिमानता आणणे अशा स्वरूपाचा कार्यक्रम उपलब्ध आहे. कौशल्य विकास आणि मार्गदर्शन कार्यक्रमांद्वारे उद्योजकता आणि नेतृत्व क्षमता शिकवली जाते. विपणन (मार्केटिंग) सहाय्य उपलब्ध आहे. कायदे आणि नियमांचे पालन केले जाते आहे ना याची खात्री करावी असे प्रोत्साहन तसेच आर्थिक सहाय्य आणि निधी प्रदान केला जातो.

२. भारतीय महिला बँक व्यवसाय कर्ज

भारतीय महिला बँकेची स्थापना अशा महिलांसाठी करण्यात आली, ज्यांच्याकडे संसाधनांचा अभाव असूनही मोठी स्वप्ने आहेत. हे महिला उद्योजकांना उत्पादन उद्योग सुरू करण्यासाठी २० कोटी रुपये पर्यंतचा वित्तपुरवठा देते. हे कमी व्याजदरावर विशेष व्यावसायिक कर्जे देखील प्रदान करते आणि CGTMSE (सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट) कव्हर अंतर्गत 1 कोटीपर्यंतचे तारण-मुक्त कर्ज देते.

महिला उद्योजक देखील ०.२५ टक्के व्याजदर कपातीसाठी पात्र आहेत. हे खेळते भांडवल आणि मुदत कर्ज एकत्र करते. परतफेड कालावधी लवचीक आहे आणि सात वर्षांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.

योजनेद्वारे उपलब्ध असलेल्या विविध प्लॅन्स पैकी काही प्लॅन्स खालीलप्रमाणे आहेत:

शृंगार: बीएमबी शृंगार कर्ज स्वयंरोजगार महिला किंवा गृहिणींसाठी आहे ज्यांना ब्युटी पार्लर उघडायचे आहे, उपकरणे खरेदी करायची आहेत किंवा दैनंदिन व्यवसायाचा खर्च भागवायचा आहे. तुम्हाला कर्जासाठी कोणतीही तारण-सुरक्षा प्रदान करण्याची आवश्यकता नाही.

परवरिश: बीएमबी परवरिश कर्ज हे स्वयंरोजगार महिला किंवा गृहिणींसाठी आहे ज्यांना डे-केअर सेंटर्स उघडायचे आहेत. क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (CGSTSM) योजनेंतर्गत, कोणत्याही तारण-सुरक्षेशिवाय कर्जाची कमाल रक्कम एक कोटी आहे.

अन्नपूर्णा: १८ ते ६० वयोगटातील अन्न उद्योजक ज्यांना छोटा व्यवसाय सुरू करायचा किंवा वाढवायचा आहे ते या कर्जासाठी अर्ज करू शकतात. त्याची वैशिष्ट्ये स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या अन्नपूर्णा योजनेसारखीच आहेत, फक्त अपवाद हा आहे की इथे कोणत्याही तारण-सुरक्षिततेची आवश्यकता नाही.

भारतीय महिला बँक (BMB) ने ही योजना लागू केली, जी नंतर २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुमच्या जवळच्या बँक शाखेत जा किंवा बँकेच्या प्रतिनिधीशी बोलण्यासाठी ०११- ४७४७२१०० या क्रमांकावर फोन करा.

३. TREAD (व्यापार-संबंधित उद्योजकता सहाय्य आणि विकास) योजना

TREAD हा महिलांसाठी कर्ज कार्यक्रम आहे ज्यांना बँक क्रेडिट सहजासहजी मिळत नाही. कार्यक्रमात व्यावसायिक कार्ये तसेच प्रशिक्षण आणि समुपदेशन सत्रे समाविष्ट आहेत. वित्तपुरवठा करणार्‍या संस्थांद्वारे निर्धारित केल्यानुसार, संपूर्ण प्रकल्प खर्चाच्या ३०% पर्यंतच्या सरकारी अनुदानातही ही योजना योगदान देते. उर्वरित ७०% या संस्थांद्वारे वित्तपुरवठा केला जाईल.

हा पुरस्कार प्रति प्रकल्प कमाल ५ लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे. कर्ज आणि अनुदान निधी अशासकीय संस्थांमार्फत (एनजीओ) प्रवाहित केला जातो, जे प्रशिक्षण प्रदान करण्याची जबाबदारी देखील घेतात. स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या निधीपैकी किमान २५% सरकारला योगदान दिल्यास सरकार प्रशिक्षणाचा खर्च (रु. १ लाखांपर्यंत) भरेल.

४. प्रधानमंत्री रोजगार योजना

महिला उद्योजकांसाठी हा एक सर्वोच्च सामाजिक आणि आर्थिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिला उद्योजकांसाठी कौशल्यावर आधारित, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्या बुद्धिमान व्यक्तींना मदत करणे हे आहे.

ही प्रणाली, जी शहरी आणि ग्रामीण भागात लागू होते ती खर्च, पात्रता आणि अनुदानावरील निर्बंधांमध्ये विविध बदलांनंतर तयार करण्यात आली. कर्ज सबसिडीची रक्कम प्रकल्प खर्चाच्या १५% पर्यंत आहे, आणि प्रति कर्जदार मर्यादा रु. १२,५०० आहे. हा कार्यक्रम उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू आहे.

पात्रतेचे कमाल वय ३५ आहे आणि व्यवसायासाठी कर्जाची कमाल रक्कम रु. २ लाख, तर सेवा आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी कर्जाची कमाल रक्कम रु. ५ लाख आहे.

५. स्त्री शक्ती पॅकेज

लहान फर्ममध्ये (कंपनीमध्ये) बहुसंख्य भागभांडवल (५०% पेक्षा जास्त) असलेल्या महिलांसाठी हे उपलब्ध आहे. या महिलांनी त्यांच्या राज्यातील संबंधित संस्थेच्या उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) मध्ये देखील नोंदणी केलेली असली पाहिजे.

योजनेअंतर्गत कर्जासाठी कोणत्याही सुरक्षिततेची आवश्यकता नाही आणि व्याज दर ११.२ टक्के पासून सुरू होतात. कमाल परतावा कालावधी ३६ महिने आहे, ज्यामध्ये एक महिन्याच्या अधिस्थगन (moratorium) कालावधीचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जावर ०.०५ टक्के व्याज कपात उपलब्ध आहे.

६. देना शक्ती योजना

हा कार्यक्रम महिला उद्योजकांसाठी देखील आहे, परंतु केवळ कृषी, किरकोळ उत्पादन, छोटे व्यवसाय आणि सूक्ष्म-कर्ज संस्था हे उद्योगच याला पात्र आहेत. महिला लाभार्थींसाठी कमाल मर्यादा मर्यादा RBI ने सेट केल्या आहेत आणि महिला ज्या क्षेत्रामध्ये व्यवसायाचा विस्तार करत आहेत किंवा व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव देत आहेत त्यावर या मर्यादा आधारित आहेत.

तुम्ही वरीलपैकी कोणतेही सुरू करण्याची तयारी करत असाल तर ही योजना वापरली जाऊ शकते. कर्जाची कमाल रक्कम रु. २० लाख आहे, पण तुम्ही अर्ज करू शकता अशी कर्जाची रक्कम तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये अर्ज करता, त्या क्षेत्राद्वारे निर्धारित केली जाते. व्याजदर मूळ दरापेक्षा ०.२५ टक्के कमी आहे.

तुम्ही या कर्जासाठी तुमच्या जवळच्या देना बँकेच्या शाखेत अर्ज करणे आवश्यक आहे. कर्ज मिळवण्यासाठी ते तुम्हाला भरण्यासाठी एक अर्ज देतील आणि संबंधित कागदपत्रांसह तो तुम्हाला त्यांना सुपुर्द करावा लागेल.

७. उद्योगिनी योजना

उद्योगिनी योजना रु. १.५ लाख पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. हा कार्यक्रम ग्रामीण आणि अविकसित भागातील महत्वाकांक्षी महिला उद्योजकांना कमी व्याजावर कर्ज देतो. ही योजना महिला उद्योजकांना ३ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज प्रदान करते जेणेकरून त्यांना त्यांचे छोटे व्यवसाय सुरू करण्यास किंवा त्यांचा विस्तार करण्यास मदत होईल. या कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या कर्जावर सरकार ३०% पर्यंत सबसिडी देते. अपंग, विधवा आणि गरीब यासारख्या विशिष्ट श्रेणीतील महिलांना उत्पन्नाच्या कमाल मर्यादेतून सूट देण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. कर्ज सबसिडीमुळे महिलांना त्यांच्या उद्योजकीय प्रयत्नांमध्ये प्रगती करणे सोपे होते.

कर्नाटक राज्य महिला विकास महामंडळाने उद्योगिनी योजना सुरू केली, तेव्हापासून ती अनेक बँकांनी विविध स्वरूपात स्वीकारली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्‍यासाठी, ही योजना ऑफर करणार्‍या बँकेच्या वेबसाइटवर किंवा बँकेच्या जवळच्या शाखेत जा.

८. अन्नपूर्णा योजना

अन्नपूर्णा योजना ही महिला उद्योजकांसाठी आहे ज्यांनी खाद्यपदार्थ/ अन्न सेवा व्यवसाय सुरू केला आहे किंवा सुरू करण्याची योजना आखली आहे. या योजनेंतर्गत स्वयंपाकघरातील मूलभूत गोष्टी, भांडी, गॅस कनेक्शन, कच्चा माल, वॉटर फिल्टर आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी त्यांना ५०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

कर्ज मिळवण्यासाठी हमीदार आवश्यक आहे. कर्ज मिळाल्यानंतर ३६ हप्त्यांमध्ये परतफेड केली जाऊ शकते (परतफेडीचा कालावधी तीन वर्षांचा आहे). शिवाय, या योजनेत बाजार दरांनुसार व्याजदर निर्धारित केले जातात.

९. सेंट कल्याणी योजना

ही योजना नवीन कंपन्या आणि विस्तार करू इच्छिणाऱ्या दोघांसाठी आहे; मुख्य फरक म्हणजे ही योजना महिला उद्योजकांसाठी तयार करण्यात आली आहे. किरकोळ व्यापार, शिक्षण आणि प्रशिक्षण आणि स्वयं-मदत गटांना ही योजना वगळते. त्यांच्या वेबसाइटवर, पात्र असलेल्या वर्गवाऱ्या नियमांसह तपशीलवार सूचीबद्ध केल्या आहेत.

या कर्जाला कोणतीही तारण आवश्यकता नाही आणि प्रक्रिया खर्च नाही कोणत्याही तारणाची किंवा प्रक्रिया शुल्काची आवश्यकता नसताना योजनेअंतर्गत १०० लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध आहे. स्वयं-मदत गट, किरकोळ व्यापार आणि शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था वगळता, हा कार्यक्रम इतर सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी खुला आहे. महिला उद्योजकांसाठीचे हे उपक्रम व्यावसायिक महिलांच्या विशिष्ट गटांना कर्ज काढून त्यांचा व्यवसाय वाढवण्यात मदत करतात.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा याविषयी अतिरिक्त माहिती आणि दिशानिर्देशनासाठी ०२२ ६६३८७७७७ या क्रमांकावर ‘महिला उद्योजक सेल’शी संपर्क साधा. तुम्ही तुमच्या जवळच्या सेंट्रल बँकेच्या शाखेतही जाऊ शकता.

१०. महिला उद्योग निधी योजना

पंजाब नॅशनल बँकेने महिला उद्योग निधी योजना सुरू केली आहे,  जिचा उद्देश लहान व्यवसायांना (SSI) मदत करणे आहे. हा कार्यक्रम 'इक्विटी गॅप' बंद करण्याचा प्रयत्न करतो. ही योजना विविध उद्योगांमध्ये ‘एम.एस.एम.ई.’ आणि लघु-व्यवसाय उपक्रमांना विस्तारीत आणि यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करते. ही योजना एस.एस.आय. युनिट्सच्या पुनर्बांधणीला देखील उत्तेजित करते ज्यांना अकार्यक्षम ठरवण्यात आले आहे परंतु तरीही ते वाचवण्यायोग्य आहेत. कर्जदाराला कर्जाची परतफेड करण्यासाठी दहा वर्षांची मुदत आहे, कमाल कर्जाची रक्कम रु. दहा लाख आहे. यामध्ये पाच वर्षांच्या स्थगिती कालावधीचा समावेश आहे.

त्रास-मुक्त कर्ज ऑफर करून, या लघुउद्योगांमध्ये आधुनिकीकरण आणि तांत्रिक वाढीस प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. या योजनेचा अर्ज येथे मिळू शकतो. तुम्ही तो भरू शकता आणि तुमच्या पंजाब नॅशनल बँकेच्या स्थानिक शाखेत टाकू शकता. SBI सारख्या इतर अनेक बँका अशाच प्रकारचे कार्यक्रम ऑफर करतात.

निष्कर्ष

संभाव्य महिला उद्योजकांना आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यास मदत करण्यासाठी हे काही मोजकेच लोकप्रिय कार्यक्रम/ योजना उपलब्ध आहेत. लक्षात ठेवा, हे कार्यक्रम केवळ महिलांसाठी समान संधी हरेक क्षेत्रात उपलब्ध करून देण्यासाठीच अस्तित्वात आहेत. पुरूषांप्रमाणेच व्यावसायिक यश मिळविण्यासाठी स्त्रियादेखील सक्षम आहेत यात फार पूर्वीपासून शंका नाही, परंतु सामाजिक अडथळे नेहमीच अस्तित्त्वात होते आणि हे कार्यक्रम त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि खरोखर मुक्त-बाजार अर्थव्यवस्थेसह एक मजबूत समाज निर्माण करण्यात मदत करतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न १. महिला उद्योजकांसाठी काही सरकारी योजना काय आहेत?

उत्तर -  महिला उद्योजकांसाठी काही सरकारी योजनांमध्ये प्रधानमंत्री रोजगार योजना, स्त्री शक्ती पॅकेज, देना शक्ती योजना, उद्योगिनी योजना, अन्नपूर्णा योजना इत्यादींचा समावेश होतो.

प्रश्न २. महिला कल्याण योजनांतर्गत महिला उद्योजकांसाठी व्यासपीठ आहे का?

उत्तर - होय, महिला उद्योजकता मंच (WEP) आहे जो भारत सरकारने नीती आयोगाच्या माध्यमातून सुरू केला आहे. हा मंच महिला उद्योजकांना आणि त्यांना मदत करण्यास उत्सुक असलेल्या प्रायोजकांना एकाच ठिकाणी एकत्र आणतो.

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture

भारतीय व्यावसायिक महिलांसाठी कोणत्या योजना उपलब्ध आहेत?

महिला उद्योजकता मंच (WEP)

भारतीय महिला बँक व्यवसाय कर्ज

TREAD (व्यापार-संबंधित उद्योजकता सहाय्य आणि विकास) योजना

प्रधानमंत्री रोजगार योजना

स्त्री शक्ती पॅकेज

देना शक्ती योजना

उद्योगिनी योजना

अन्नपूर्णा योजना

सेंट कल्याणी योजना

महिला उद्योग निधी योजना