Women's Day Special :मुक्तामणी देवी, एक आई ते पद्मश्री प्रवास !!

6 minute
Read

Highlights एक छोटीशी घटना आणि त्या घटनेनं बदललं संपूर्ण आयुष्य…असंच काहीसं घडल मुक्तामणी देवी यांच्या आयुष्यात…काकचिंग, मणिपूर येथे राहणाऱ्या मुक्तामणी देवी त्यांची यशोगाथा जगभर प्रसिद्ध आहे. कोण आहेत या मुक्तामणी देवी? त्यांनी कोणतं कार्य केलं? म्हणून आज सगळीकडे त्यांची चर्चा होते. चला तर मग वाचूया….

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

प्रत्येक आई-वडिलांना वाटतं आपल्या मुलाला सर्व सुखसुविधा मिळाव्यात. मुलाची प्रत्येक मागणी पूर्ण करता यावी पण काहीवेळेला परिस्थितीच अशी येते की मुलांची मागणी किंवा त्यांचा हट्ट पुरवणं पालकांना शक्य नाही. अशीच परिस्थिती होती मणीपूरमध्ये राहाणाऱ्या मोइरंगथेम .>मुक्तामणी देवी यांची ! मुलीसाठी एक जोड बूट त्या खरेदी करु शकत नव्हत्या आणि आज त्यांच्या चप्पल-बूटचा व्यवसाय जगभरात पसरला आहे. भारत सरकारने २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला. . 

मुक्तामणी देवी

आईच्या संघर्षाची कहाणी

मुक्तामणी यांचं संपूर्ण आयुष्य अडचणींवर मात करण्यात गेलं. बुक ऑफ अचिव्हर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार त्यांचा जन्म डिसेंबर १९५८ मध्ये झाला. वयाच्या अवघ्या १६-१७ व्या वर्षी त्यांचे लग्न झालं आणि लग्नानंतर चार मुलं. संसाराचा गाडा रेटण्यासाठी मुक्तामणी दिवसभर शेतात काम आणि संध्याकाळी भाजी विकण्याचे काम करत होत्या.थोडे जास्त पैसे मिळावे यासाठी त्या रात्री बॅग विणत बसायच्या. तो काळ होता १९८९ चा मुक्तामणी देवी यांची परिस्थिती इतकी हलाखीची होती, की त्यांच्याकडे आपल्या मुलीसाठी बूट खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. बूट नाही म्हणून मुलगी शाळेत जात नव्हती. मुलीला भीती होती शिक्षिका ओरडतील. तेव्हा मुक्तामणी यांनी स्वतः मुलीला बूट शिवून दिले. दुसऱ्या दिवशी त्यांची मुलगी शाळेत गेली, तेव्हा शिक्षिकेने तिला बोलावले आणि तिचे बूट कोणी बनवले असे विचारले. मुलीने सांगितले,’माझ्या आईने बनवले आहेत.’ त्या शिक्षिका हसल्या आणि म्हणाल्या, ‘मला सुद्धा अशी एक जोडी बनवून मिळेल?’ 

मुक्तामणी देवी आणि कुटुंब

त्या बुटाची कथा आणि भाग्योदयाला सुरुवात 

या घटनेने  मुक्तामणी यांच्या आयुष्यात भाग्योदय व्हायला सुरुवात झाली.अनंत अडचणींवर मात करत मुक्तामणी यांनी १९९०-९१ मध्ये स्वतःच्या नावाने 'मुक्ता शूज इंडस्‍ट्री' सुरु केली. काही दिवसातच त्यांनी तयार केलेल्या बुटांनी बाजारात नाव कमावलं आणि त्यांच्या बुटांना मागणी वाढली.मुक्तामणीने यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर आणि अनेक प्रदर्शनीच्या माध्यमातून आपले प्रॉडक्ट सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या कारखान्यामध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी शूज बनवले जातात. मुक्तामणी यांची कंपनी परदेशात शूज निर्यात करते.

मुक्तामणी यांच्या बूट दुकान

पद्मश्री पुरस्काराने सन्मान 

मुक्तामणी देवी यांनी एक हजारहून अधिक महिलांना बुट कसे तयार करायचे त्याचे प्रशिक्षण दिले आहे. स्वतःप्रमाणे अनेक महिलांना त्या स्वावलंबी बनवत आहेत. बूट कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण वर्ग मुक्तामणी देवी यांनी सुरु केले. महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, काही पैसे कमवू लागल्या तर कुटुंबाला चांगला हातभार मिळतो असा विचार मुक्तामणी करतात. स्वावलंबनाचे धडे महिलांना देवून त्यांना सन्मानाने जगायला शिकवत आहेत. मुक्तामणी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने त्यांना २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानीत केलं. 

मुक्ता इंडस्ट्रीजमध्ये कसे तयार होतात शूज ?

मुक्ता इंडस्ट्रीजने बनवलेले शूज हवामानाच्या प्रभावापासून आपल्या पायांचे संरक्षण तर करतेच, याचसोबत हे बूट आपण सहज धुऊन वाळवू शकतो.शूज बनवणे काही सोपे काम नाही आहे. शूजची जोडी बनवण्यासाठी किमान तीन दिवस तरी लागतात. मुक्तामणी स्थानिक बाजारपेठेतून आणि इंफाळच्या बाजारपेठांमधून लोकर आयात करून विणकाम करतात. पुरुष बुटांचे सोल बनवतात, तर स्त्रिया विणकाम करतात. एक कारागीर एका दिवसात १००-१५० सोल बनवू शकतो. शूजच्या डिझाइनची जबाबदारी मुक्तामणी देवी यांच्याकडेच  आहे. मुक्ता शूज इंडस्ट्री एका दिवसात १० जोड्या शूज बनवते. बदलत्या काळानुसार मुक्तामणी यांनी तयार केलेल्या शूजमध्ये नाविन्यता आढळते. 

मुक्तामणी देवींच्या  जिद्दीचा सलाम !!

कोणतीही भारतीय महिला मग ती गरीब असो वा श्रीमंत तिला व्यवसाय  सांभाळायचं असेल तर कुटुंब आणि घर याकडे आधी लक्ष द्यावं लागतं. मुक्तामणी यांनी काम आणि घर यात समतोल साधला. एका छोट्या घटनेतून त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. मुक्तामणी स्वतःबरोबर अनेक महिलांचं भविष्य घडविण्याचे काम करत आहेत. स्वतःबरोबर इतर महिलांना स्वावलंबनाचे धडे देवून समाजात ताठ मानेनं आणि सन्माने कसं जगायचं ते शिकवत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त मोइरंगथेम मुक्तामणी देवी यांच्या कार्याला सलाम !!!

अनिता किंदळेकर 

 

Logged in user's profile picture




कोण आहेत या मुक्तामणी देवी?
मोइरंगथेम मुक्तामणी देवी यांची ! मुलीसाठी एक जोड बूट त्या खरेदी करु शकत नव्हत्या आणि आज त्यांच्या चप्पल-बूटचा व्यवसाय जगभरात पसरला आहे. भारत सरकारने २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला.
मुक्ता इंडस्ट्रीजमध्ये कसे तयार होतात शूज ?
मुक्ता इंडस्ट्रीजने बनवलेले शूज हवामानाच्या प्रभावापासून आपल्या पायांचे संरक्षण तर करतेच, याचसोबत हे बूट आपण सहज धुऊन वाळवू शकतो.शूज बनवणे काही सोपे काम नाही आहे. शूजची जोडी बनवण्यासाठी किमान तीन दिवस तरी लागतात. मुक्तामणी स्थानिक बाजारपेठेतून आणि इंफाळच्या बाजारपेठांमधून लोकर आयात करून विणकाम करतात. पुरुष बुटांचे सोल बनवतात, तर स्त्रिया विणकाम करतात