'मासिकपाळी' मध्ये योगासने करा !

7 minute
Read

Highlights 'मासिक पाळी' अनेक स्त्रियांना त्रासदायक वाटते. काही मुली आणि स्त्रियांना या पाळीचा इतका त्रास होतो की ती कधी एकदा संपते असे होऊन जाते. पाळीच्या आधी किंवा त्या दिवसात दुखणारी कंबर आणि पाय यामुळे स्त्रिया फारच थकून जातात. स्त्रीची ताकद असणारी ही पाळी कधी एकदा बंद होते असेही अनेकींना वाटून जाते. मग हा त्रास कमी व्हावा यासाठी कधी पेनकिलर घेतल्या जातात तर कधी इतका त्रास होतो की डॉक्टरांकडेच जाण्याची वेळ येते. पण मासिक पाळीदरम्यान काही योगासने केल्यास हा त्रास कमी होण्याची शक्यता असते. ती योगासने कोणती आहेत चला पाहूया….

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

मासिक पाळी…महिलांच्या जीवनातील नैसर्गिक पण खूप नाजूक चक्र आहे.अनियमित पाळी, पाळी न येणे, ओटीपोटी दुखणे, जास्त रक्तस्त्राव होणे,पाठदुखी, कंबरदुखी, थकवा असे त्रास मासिक पाळीत जाणवतात. काहीजणी तर मासिक पाळीत आजारी पडतात. या सगळ्या त्रासातून मुक्तता हवी असेल तर अनेकवेळा गोळ्यांचा आधार घेतला जातो किंवा काहीजणी अंगावरच दुखणं सहन करतात. या त्रासातून तुम्ही मुक्त होवू शकता त्यासाठी तुम्हाला करायला हवं योगासन ! योग केल्यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारतं. मासिक पाळीत योगासने केली असता पोटातील वेदना, पाठ दुखणे, रागरंग बदलत राहणे, संतापणे, नैराश्य, चिडचिड आणि इतर तक्रारी कमी होवू शकतात. काही सोप्या योगासनांची माहिती जाणून घेवू या.

बालासन  -  बालासनाला इंग्रजीमध्ये ‘चाईल्ड पोझ’ असे म्हणतात, कारण हि आसनावस्था गर्भातील बालकाप्रमाणे भासते. ज्या प्रमाणे गर्भातील बालकाला गर्भात आराम मिळतो अगदी तसाच आराम बालासनामुळे मिळतो. बालासन करताना योगा मॅटवर वज्रासनात बसा. आता कमरेतून समोर झुका आणि आपले मस्तक जामिनीला टेकवा.आपले दोन्ही हात आपल्या खांद्याला समांतर ठेवून समोर लांब करा.आपल्या हाताचे दोन्ही तळवे जमिनीला टेकवा.आपल्या छातीने आपल्या मांड्यावर दाब द्या. बालासन करताना श्वासोश्वास चालू राहू द्या. बालासनामुळे पाठीच्या कण्याला भरपूर व्यायाम मिळतो. पाठ आणि कंबरदुखी कमी होते.मेंदु आणि मन शांत होतं. 

मार्जरासन - लहान मुलांना घोडा घोडा करताना जी स्थिती असते त्याचप्रमाणे आहे मार्जरासन ! हे आसन करताना हात आणि गुडघे जमिनीला टेकलेले आणि एकमेकांना समांतर राहतील असे बघा. त्यानंतर श्वास घेऊन चेहरा वरच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करा. मग श्वास सोडत हनुवटी खाली नेत छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये एकदा कंबर खाली जाईल आणि एकदा वरच्या बाजूला जाईल. मासिक पाळीतील त्रास कमी होण्यास या आसनामुळे फायदा होतो. 

अर्ध पवनमुक्तासन - योगा मॅट घ्या. पाठीवर झोपा. उजवा पाय गुडघ्यात वाकवून गुडघा दोन्ही हातांनी धरुन छातीजवळ आणायचा प्रयत्न करा. तुम्हाला आरामदायी वाटत असेल तर डावा पाय ताणण्याचा प्रयत्न करा. सुरुवातील उजवा पाय, मग डावा पाय असे करा.मग दोन्ही पायांचा उपयोग करा. या आसनामुळे पोटातील वायू मुक्त होतो. कंबर,पोट,ओटीपोट आणि मानेच्या स्नायूंचाही चांगला व्यायाम होतो.मासिक पाळीमध्ये काही स्त्रियांना गॅस, अपचनाच्या समस्यांचाही त्रास सहन करावा लागतो. यासाठी तुम्ही अर्ध पवनमुक्तासनाचा सराव करू शकता. या आसनामुळे पोटातील वायू मुक्त होण्यास मदत मिळते. तसंच कंबर, पोट, ओटीपोट आणि मानेच्या स्नायूंचाही चांगला व्यायाम होतो.

वक्रासन - योगा मॅटवर दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून ताठ बसा. उजवा पाय गुडघ्यातून दुमडून डाव्या पायाच्या पलिकडे गुडघ्यापाशी नेण्याचा प्रयत्न करा. जो पाय दुमडला आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला हात नेण्याचा प्रयत्न करा. दुसरा हात मागच्या बाजूला जमिनीला समांतर ठेवा. यामुळे मासिक पाळीतील कंबरदुखी कमी होण्यास मदत होईल. फुफ्फुसाची क्षमता वाढते. अधिकाधीक ऑक्सिजन शरीरात घेतला जातो. पाठ, मणका आणि पोटाला व्यायाम मिळतो.

सेतु बंधासन - मासिक पाळीमध्ये त्रास होऊ नये यासाठी या आसनाचा सराव करावा. सेतु बंधासनामुळे शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते. या आसनामुळे छातीचे स्नायू, मान आणि पाठीचा कण्याला चांगला ताण मिळतो.ऍंक्झायटी, थकवा, निद्रानाश, डोकेदुखीपासून सुटका होते.योगा मॅटवर पाठीवर उताणे झोपा. हात बाजूला ठेवा. आता गुडघे वाकवून कंबर आणि नितंबाचा भाग जमिनीपासून वर उचला. हात जमिनीवरच ठेवा.श्वास हळूहळू घ्या.यानंतर श्वास सोडत पुन्हा कंबर जमिनीवर टेकवावी. पाय सरळ करून विश्रांती घ्यावी. काही सेकंद विश्रांती झाल्यानंतर पुन्हा हे आसन करा.

शवासन - योगासन करताना सर्वात शेवटी शवासन करतात. हे आसन सर्वात सोपे आहे. या आसनामुळे संपूर्ण शरीरावरील ताण कमी होण्यास मदत मिळते. योगा मॅटवर झोपा.दोन्ही पायांमध्ये समांतर अंतर ठेवा. पायांच्या टाचा आतील बाजूस ठेवा.दोन्ही हात शरीरापासून काही अंतर दूर ठेवा. डोळे बंद करा. आता आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रीत करा. शवासनाच्या क्रियेत झोप न येऊ देता पूर्ण सतर्क राहून शवासन केल्याने जास्त फायदा होतो.शवासन करताना सुस्त वाटत असल्यास, दीर्घ श्वास घ्या. शवासनामुळे शरीर शांत होतं, रक्तदाब, चिंता कमी होतात. शरीरातील ऊर्जा वाढते. 

जिथे शरीर आणि मन सुदृढ आहे, तिथे जीवनाचा आनंद आपण मनमोकळेपणाने घेवू शकतो. योगासनामुळे हे शक्य आहे. मासिक पाळीच्या काळात होणार त्रास कमी करण्यासाठी ही योगासने करा. सुरुवातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि एकदा तुम्हाला नीट माहिती झाली की तुम्ही स्वतःहून योगासने करायला लागला. सुरुवातील थोडा कंटाळा येईल पण मासिक पाळीतील त्रास सहन करण्यापेक्षा तो दूर करण्याचा प्रयत्न करा. योग ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे त्याचा लाभ घ्या आणि सुखी-आनंदी जीवन जगा. 

अनिता किंदळेकर 

 

 

Logged in user's profile picture